Saturday, May 1, 2010

नावात काय आहे

बाळाचा जन्म झाला की आपण त्याच्यासाठी अगदी शोधून, विचार करून आपल्याला हवं तसं नाव ठेवतो. पण आडनाव मात्र अगदी जन्मापासूनच आपल्याला चिकटलेले असतं आणि तेच जन्मभर बाळगावं लागतं. मग कधी ते अर्थपूर्ण असतं तर कधी लज्जास्पद ; पण तरी आपलंच असतं आणि कधी कधी नावापेक्षाही पदोपदी तेच उच्चारलं जातं, किंबहुना त्यानेच एखाद्याची ओळख..खास ओळखही होते.
पाटकर, परूळेकर, खानोलकर, वालावलकर ही आडनावे कशी आपल्या कोकणातल्या गावाशी इमान राखणारी असतात. ही आडनावे त्या व्यक्तीचे गाव, कूळ, जात याचीही प्रथमदर्शनीच माहिती देतात. "तू पाटाचा पाटकर काय रेऽऽ ? मी पण पाटाचाच." असं म्हणत कोकणी भाषेतल्या गजालीने त्या दोन अपरिचित व्यक्तिंमध्येही एक स्नेहाचे जाळे विणले जाते आणि परकेपणाच्या भिंती नाहीशा होतात. काही आडनावे गावंच नव्हे तर जिल्ह्याची, प्रांताची अभिमानी असतात. जसं नाशिककर, सातारकर, जळगांवकर, औरंगाबादकर वगैरे.
राजे, प्रधान, सामंत, दिवाण अशी आडनावे ऐकली की कसं शाही दरबारात गेल्यासारखं वाटतं. भोसले म्हटलं की शिवरायांचा आठवावा प्रताप! जेधे, राणे, शिंदे ही तर महाराजांची मावळे मंडळी. होळकर म्हटलं की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि गायकवाड म्हटलं की सयाजीराव गायकवाड ह्यांच्याशिवाय दुसरं कुणीच आठवत नाही. या आडनावांनी इतिहास घडविला.नेहरू, गांधी, टिळक..ह्या व्यक्ति की आडनावे की घराणी? ह्यांच्या आडनावांनी स्वातंत्र्यापूर्वीचा काळ आठवतो."तू कोण एवढा मोठा लागून गेलास....टाटा की बिर्ला ?"...ही दोन्ही आडनावे आपल्या कर्तृत्वाने जगभर पसरली.
लोहार, सुतार, सोनार, शिंपी ही आडनावे आपल्या पूर्वीच्या बारा बलुतेदार समाजव्यस्थेवरून आली असावी. ती समाजव्यवस्था आता नाही पण आडनावे मात्र राहिली. आता गंमत बघा..लोखंडे, पितळे, तांबे आडनावात हे धातू कसे आले?आणि बरं का आडनावांत भाज्या पण आहेत.पडवळ, शिराळे, भोपळे, गवारे, मुळे इत्यादि. तसं प्राणी आणि पक्ष्यांनीही, अगदी किडामुंगीनेही आडनावात प्रवेश केलाय. वाघ, वाघमोडे, वाघमारे, वाघधरे, म्हैसकर, गाढवे, कोल्हे, मगर, ससाणे, गरूड, राजहंस आणि शेवटी मुंगी सुद्धा आहे.
रोडे आहेत आणि ढोले ही आहेत. काळे आहेत, गोरे आहेत. सरळ आहेत, वाकडे आहेत. धोंडे, खडीवाले, खडीकर असे पत्थर दिलवाले भी है! चिरमुले म्हटलं की हमखास कुरमुरे आठवतात. आडनावात रंगही भरलेले दिसतात. हिरवे, तांबडे, कबरे वगैरे. स्वयंपाक घरातील पदार्थही अधूमधून आडनावांत डोकावतात. कोथमिरे, हिंगमिरे, हळदणकर, मीठबावकर, दूधवडकर, तांदळे इत्यादि.
पर्वते आहेत, समुद्रे आहेत. या दोघांना जोडणार्‍या नदीचे आडनाव मात्र मी कधी ऐकले नाही पण कधीतरी तेही नाव सापडेल.पण क्षीरसागर मात्र आहे. माझ्या एका मैत्रिणीचे आडनाव आहे गोडकर. गोडकर...म्हणजे सारं काही गोड करा..असा संदेश ते आडनाव देतं म्हणून मला ते फार आवडतं. पण कडू म्हटलं की कार्ल्याची भाजी खाण्यासारखे वाटते. परवा सहज वाचनात आलं आंबटकर आडनाव, तेव्हा अगदी आंबट चिंच खाल्ल्यासारखा शहारा आला.
कधी या भूतलावर आडनावात साक्षात देव व प्रभू अवतरलेत. त्यांची पूजा करायला पुजारी, उपाध्ये आहेत. पूजेसाठी लागणारी फुलेही आहेत. मोगरे, सोनटक्के, चाफेकर आहे, गंधे, चंदनशिवे आहेत. फुले फुलवणारे माळी आहेत. कथा पुराणे सांगायला पुराणिक, शास्त्री आहेत. गार्‍हाणं घालायला गुरव आहेत. केवळ नामस्मरण करा असा सोपा भक्तिमार्ग दाखवणारे संत आहेत. समर्थ रामदासांची परंपरा चालवणारे समर्थ, रामदास, गोसावी, गोस्वामी आहेत. देवांची देवळे बांधणारे देवळेकर आहेत.
पंडीत, महाशब्दे, बुद्धीसागर, सहस्त्रबुद्धे अशी बुद्धीमत्ता दाखवणारी आडनावे आहेत. व्यवहार सांभाळणारी व्यवहारे, चिटणीस आहेत. हिरे, पोवळे अशी रत्ने आहेत आणि त्यांची पारख करणारे रत्नपारखी पण आहेत. यांचा व्यापार करणारे सौदागर, दलालही आहेत. फार काय सांगू? गणितातले आकडेही आडनावांत घुसले आहेत. बघा एकबोटे, द्विवेदी, त्रिवेदी, सातपुते, वीसपुते, दशपुत्रे, हजारे, सहस्त्रभोजने आणि अब्जबुद्धे पण.
सगळ्यात शेवटी फार जुन्या आणि छोट्यातल्या छोट्या नाण्याची आठवण करून देणारं एक , एकाक्षरी आडनाव सांगते...आठवलं का? ते आहे ’पै’.अशी ही आडनावाची आडवळणी, गंमतीशीर ओळख आहे. तेव्हा आडनावात काय आहे असं म्हणण्यापेक्षा आडनावात काय नाही? असंच म्हणावं लागेल.
पूर्वप्रकाशन: डिसें. २००९: hivaliank.blogspot.com

No comments:

Post a Comment