Friday, April 30, 2010

साठवणीतल्या आठवणी - २

टीव्ही वरच्या जाहिराती या कधीं कधीं मधल्या कार्यक्रमापेक्षांहि छान असतात. आपल लक्ष वेधून घेणार्‍याहि असतात. त्या दिवशी अशीच पेप्सोडेंटची देढ गुना ची जाहिरात लागली होती. त्यात पर्स मोठी होताना दाखवली. आणखी काय काय दाखवले त्यांत एक फोल्डिंग पेला असा वर उचलून मोठा होताना दाखवला. ते मी बघितल आणि मी म्हटल जय (नातूमहाशय) बघ रे पोयनाडच्या घरी असाच पेला होता. जय म्हणाला यातून पाणी नाहीं का सांडणार? अरे मी खरच पहिलाय, हाताळलाय कित्ती वेळा अस सांगतानाच पोयनाडच्या म्हणजे माझ्या आजोळच्या असंख्य आठवणी, अरेबियन नाईट्ससारख्या सुरस आणि आता चमत्कारिक वाटतील अशा कथा आठवल्या.
आता नव्या मुंबईमुळें पेण पनवेल अगदी हाकेच्या अंतरावर आले. जाणे येणे सोपे झाले. पण माझ्या लहानपणी दादरहून टॅक्सीने भाऊच्या धक्क्याला जाऊन तिथून रेवस धरमतर लॉंच पकडून मग तिथून टांग्याने पोयनाडपर्यंत असा तीनचार वाहनातून जमीन पाणि असा जोडत जोडत किती तरी तासांचा प्रवास होई.
पण एकदा घरी पोहोचलो की आमचे काका, यमूताई व अख्ख घरच स्वागताला तयार असायच आणि आम्ही खूष होऊन जायचो. थकवा पार पळून जायचा. आठशे खिडक्या नऊशे दार कुण्या वाटन बा भी नार अस आमच मोठ घर. घरात शिरल की मोठ पुढच अंगण. बरीच कसली झाडे होती. पण आठवत ते डेरेदार जांभळाच झाड. त्याला खूप जांभळे यायची आणि एवढी मोठी आणि चवदार आणि एवढ्या प्रमाणात यायची की अंगणभर जांभळांचा सडा पडून जणू अंगण जांभळे होऊन जायचे. तिथून चार पायर्‍या चढल्या की ओटी लागायची. त्यात शिसवी लाकडाचा सोनेरी चौफुल्याचा व कड्यांचा मोठा झोपाळा झुलत असायचा. त्यावर सात आठ मुले बसून झुलत राहायची. या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत. अरे हो, एक मजा सांगू का, ओटीला भिंत फक्त एका बाजूला. समोर आणि दोन्ही बाजूंना फळ्या होत्या. त्या खाचेत वर खाली बसवलेल्या होत्या. सफेद रंगाने नंबर लिहिलेले असयचे व मध्ये धरायला एक आडवी पट्टी असायची. त्या फळ्या हळूहळू काढायच्या. आताच्या स्लायडींग विंडोसारख्या आणि मग ती ओटी जणू ओपन टेरेसच व्हायची. व अंगणाच्या पुढच, पार रस्त्यावरचहि दिसू लागायचं. दिवसा त्या फळ्या क्रमानें काढायच्या व झोपाळा कड्यावर लावायचा व रात्री उलट्या क्रमाने फळ्या लावून ठेवायच्या व झोपाळा काढून ठेवायचा असा उद्योग असे. पण त्यात वेळ गमतीत जाई. आमचा मिठाचा व्यापार होता. शेतावरून भातहि येई. त्यासाठी ही व्यवस्था असावी.
त्या ओटीच्या डाव्या बाजूला कोठारघर होते. त्याचीहि मजा. त्याला अशा बाहेरच्या बाजूला छोट्या छोट्या खिडक्या होत्या. एकेक खिडकी उघडायची की त्यातून बदाबदा धान्य बाहेर येई. आधी वरची मग त्याखालची अस तळापर्यंत जायच. भात संपला की त्यात आंब्याची अढी घातली जायची. त्यावेळी घरात माझी मोठी बहीण व माझा आतेभाऊ दोनच लहान मुले. त्यामुळे त्यांची खूपच चंगळ होई. नाश्त्याला आंबे जेवायला आंबे. तिन्ही त्रिकाळ आंबेच आंबे. आता २००-३०० रु. डझन आंबे खातांना एकेक मोजून खावा लागतो.
ओटीवरून दोनतीन पायर्‍या चढून गेलो की छोटीशी चौकोनी जागा होती. तिला लाकडी कठडा होता. तिथे कारकून बसत असे. एक लिहायचे तिरपे मेज व तिजोरी असे. ती तिजोरी मला खूप आवडायची. एवढी जाड व अनेक कप्प्यांची होती. सुटी नाणी, नोटा, त्यात एक चोरकप्पाहि होता. अगदी कुणालाहि न कळणारा. तिजोरीला पितळी कडी व दोन्ही बाजूला नक्षीदार हॅंडल्स होती. पण उचलायला खूप जड होती. व्यापारउदीम असल्यामुळें ती घरात असावी. आमचे पणजोबा झोपाळ्यावर बसून कारकुनाला सूचना देत हिशेब ठिशेब ठेवत असावेत. पोयनाडचे घर विकल्यावर ती वैभवशाली वस्तू मी खूप वर्षे सांभाळली. पण काही कारणाने राहत्या जागेचे खूप शिफ्टींग करावे लागल्याने ती शेवटी कुणाला दिली आठवत नाही.
तिथून आत गेले की माजघर म्हणजे हॉल लागे. त्यामध्ये भिंतीतील कपाटें म्हणजे फडताळे होती. ती मला खूप आवडत. त्यात मला काहीही लपवायला मिळायचे. खर म्हणजे या फडताळाला नवीन रूप दिल तर आजच्या छोट्या जागेला उपयोग होईल. कारण खालची जागा आडत नाही, लाकूड कमी लागते आणि मल्टीपर्पज होतात. ती फडताळे प्रत्येक खोलीत असायची. पुस्तकंसाठी, दिव्यांसाठी, दूधदुभत्यासाठी, लोणच्यासाठी आणि कशाकशासाठी. तसा एक हडपा म्हणजे मोठा लाकडी जड पेटारा अगदी ४ छोटी मुले सहज उभी राहतील असा मोठा होता. त्यावर पेट्रोमॅक्सची बत्ती, समया, लामणदिवे, लहानमोठे स्टॅंडचे दिवे, चिमण्या, असे दिव्यांचे संमेलनच तिथे असायचे. संध्याकाळ झाली की भाताच्या तुसाच्या वस्त्रगाळ पावडरने दिव्यांच्या काचा साफ करून त्यात त्या त्या प्रकारच्या वाती व तेल घालून दिवे सज्ज ठेवायचे व तिन्हीसांजानंतर दिवे उजळायचे व घर प्रकाशमय व्हायचे.
माजघरातून आत गेले (डाव्या बाजूने) की देवघर लागायचे. एका खूप मोठ्या कोनाड्याला देवळासारखी महिरप होती व आत दोन फळ्या होत्या. त्यावर देव मांडलेले असायचे. खूप मोठी समई व पोळपाएवढी सहाण व तीवर वरवण्ट्याएवढे चंदनाचे खोड होते. वर्षानुवर्षे चंदन उगाळून सहाणेवर मध्ये खोलगट भाग झाला होता. फॅमिली डॉक्टरसारखे तेव्हा फॅमिली गुरुजी होते ते रोज नित्यनियमाने यथासांग पूजा करीत. संकष्टी, एकादष्णी, अभिषेक असे देव्हार्‍यामध्यें विठ्ठल रखुमाई, शाळिग्राम अन्नपूर्णा व बाळकृष्ण होता. गणपती होता. सर्वात मला आवडायचा तो बाळकृष्ण. चांदीचा वजनाला जड, तळहातावर राहील एवढा. मोरपिसाची टोपी, कमरेला साखळ्या, हातात सलकडी, गोंडस गोजिरे रूप. हा मात्र मी अजून जपून ठेवलाय. गणपतीच्या म्हणे सोन्याच्या २१ दुर्वा होत्या. कोणी चोरल्या की निर्माल्यातून गेल्या माहीत नाही.
देवघरातून एक छोटासा जिना माळ्यावर जात होता. चांगला ऐसपैस. २ माणूस उंचीचा. तिथे एका खांबाला एक मोठे रांजण व त्यात एक मोटी रवी होती. ताक करायला. ते आठवल की मला गाण आठवायच
राधा गौळण करिते मंथन मनात हरीचे अविरत चिंतन
लोणी काढून घरातल्यांना पुरेसे ठेवून अख्ख्या गावाला ताक फुकट वाटले जाई. वर माळ्यावर सात छोट्या तपेल्यात तूप ठेवलेले असायचे.कशासाठी? तर निरांजनात घालण्यासाठी. माझ्या धाकट्या आत्याकडे सगळ्यासाठी निरांजनात तूप घालून वाती वगैरे घालून ती तयार ठेवण्याचे काम असायचे. त्या आत्याला तूप खूप आवडायचे. ती सर्व निरांजनात तूप घालून झाले की चमच्याने भरपूर तूप हातावर घेऊन खायची. एकदा हे आमच्या आजीने बघितले व खूप ओरडली. तर नाना (आजोबा) आजीला ओरडले व म्हणाले अग खाऊ दे ना. पोर नंतर दुसर्‍या घरी जाईल. तोपर्यंतच खाणार ना? तर आजी म्हणाली अहो दुसर्‍या घरी जाणार म्हणूनच तर म्हणते. दुसरीकडे अस दूधदुभत असेल नसेल. म्हणून आतापासूनच संयम हवा हो. माझी पण ती मुलगीच आहे.
देवघरातील फडताळे व हडपा होताच. त्यात मला वाटतेदेवाची व स्वयंपाकाची जास्तीची भांडी असावीत. एकूण पोयनाड हडप्पा संस्कृती होती म्हणायची. माजघराच्या दुसर्‍या बाजूला एक बाळंतिणीसाठी स्पेशल रूम होती. त्यात एक फडताळ व कॉट एवढेच असायचे. तिथून एक म्हणजे माजघरातून बाहेर पडायला दार होते. व गंमत म्हणजे त्याला कड्याकोयंडे होतेच पण दाराच्या दोन्ही बाजूला भिंतीत एक खोल होल भोके होती. एका भिंतीतून एक चौकोनी जाड मुसळ बाहेर येई ते समोरच्या भिंतीतील होलमध्ये घालायचे की बाहेरून हत्तीने ठोकले तरी दार काय उघडेल बिशाद असा कडेकोट बंदोबस्त. असे सर्व मुख्य दाराला बसवलेले असत त्याची लहानपणी खूप मजा वाटायची.
माजघरातून देवघरात गेले की एका बाजूला चार पायर्‍या उतरले की लांबट अशी मोठी खोली होती. तिचे दार अंगणात उघडे. मला वाटत दुपारी घरातील बायकांना विश्रांति घ्यायला, शिवण विणकाम करायला ती स्वतंत्र रूम असावी. देवघरातून उजवीकडे उतरले की स्वयंपाकघर लागे. तिथे फळ्यावर वेगवेगळी भांडी असत. पेले नक्षीचे मीनावर्कचे खूप तर्‍हांचे. तसे तांबेहि वेगवेगळे कलश, तांब्या, लोट्या, मारवाडी लोटे. थाळ्या, ताटे; मला आठवते की एक ताट कसले होते ते आठवत नाही. पण ते एकच होते व मला खूप आवडायचे व आतेबहीण रजूलाही तेच हवे असायचे. शेवटी भांडण नको म्हणून काकाने जाऊन तस्संच दुसर ताट आणल. देवघर मोठे लांबलचक होते. तिथेच पुरुषांच्या जेवणाच्या पंगती बसत. स्वयंपाकघरातून बायकांना वाढायला सोपे जाईल अशी ती सोय होती.
स्वयंपाकघरातून देवघरात न जाता डव्या बाजूने बाहेर पडले की पाठची पडवी होती. तिथे एक मोठ्ठे तपेले होते. त्यात दिवसभराचे पाणी साठवून ठेवत. आमच्या दारातल्या विहिरीला पाणी नव्हते त्यामुळे लांबून पाणी आणून त्यात सारखे ओतत राहायची ड्यूटी एका कुंभारणीवर होती. ते तपेले एवढे मोठे होते की अलीबाबाच्या चाळीस चोरापैकी २ चोर तरी त्यात सहज लपले असते अणि यमूताई मर्जिना झाल्या असत्या. त्या पडवीतच एक छोटासा दगडी खळगा होता. तो हळकुंड किंवा छोटसं काही कुटायच असल्यास तो वापरला जाई. कोपर्‍यात मुसळ, टोपली, जातं, सुपं असच गृहोपयोगी वस्तू निमूटपणे बसायच्या.
तिथून बाहेर पडलो की पाठच अंगण, त्यामध्ये गाईगुरांचा गोठा, थोडीफार झाड, विहीर, तुळशीवृंदावन आणि कुळाचे (कसणार्‍या शेतकर्‍याच) छोटस झोपडीवजा घर.
कधी कधी आपल्या स्मरणशक्तीची मजा वाटते. सिरीयलमध्ये कालच्या एपिसोडला काय झाल हे आठवत नाही. पण एका ऍडमधल्या पेल्यावरून पोयनाडची अख्खी सिरीयल अगदी बारकाव्यासकट आठवली बघा.

No comments:

Post a Comment