Friday, April 30, 2010

साठवणीतल्या आठवणी - २

टीव्ही वरच्या जाहिराती या कधीं कधीं मधल्या कार्यक्रमापेक्षांहि छान असतात. आपल लक्ष वेधून घेणार्‍याहि असतात. त्या दिवशी अशीच पेप्सोडेंटची देढ गुना ची जाहिरात लागली होती. त्यात पर्स मोठी होताना दाखवली. आणखी काय काय दाखवले त्यांत एक फोल्डिंग पेला असा वर उचलून मोठा होताना दाखवला. ते मी बघितल आणि मी म्हटल जय (नातूमहाशय) बघ रे पोयनाडच्या घरी असाच पेला होता. जय म्हणाला यातून पाणी नाहीं का सांडणार? अरे मी खरच पहिलाय, हाताळलाय कित्ती वेळा अस सांगतानाच पोयनाडच्या म्हणजे माझ्या आजोळच्या असंख्य आठवणी, अरेबियन नाईट्ससारख्या सुरस आणि आता चमत्कारिक वाटतील अशा कथा आठवल्या.
आता नव्या मुंबईमुळें पेण पनवेल अगदी हाकेच्या अंतरावर आले. जाणे येणे सोपे झाले. पण माझ्या लहानपणी दादरहून टॅक्सीने भाऊच्या धक्क्याला जाऊन तिथून रेवस धरमतर लॉंच पकडून मग तिथून टांग्याने पोयनाडपर्यंत असा तीनचार वाहनातून जमीन पाणि असा जोडत जोडत किती तरी तासांचा प्रवास होई.
पण एकदा घरी पोहोचलो की आमचे काका, यमूताई व अख्ख घरच स्वागताला तयार असायच आणि आम्ही खूष होऊन जायचो. थकवा पार पळून जायचा. आठशे खिडक्या नऊशे दार कुण्या वाटन बा भी नार अस आमच मोठ घर. घरात शिरल की मोठ पुढच अंगण. बरीच कसली झाडे होती. पण आठवत ते डेरेदार जांभळाच झाड. त्याला खूप जांभळे यायची आणि एवढी मोठी आणि चवदार आणि एवढ्या प्रमाणात यायची की अंगणभर जांभळांचा सडा पडून जणू अंगण जांभळे होऊन जायचे. तिथून चार पायर्‍या चढल्या की ओटी लागायची. त्यात शिसवी लाकडाचा सोनेरी चौफुल्याचा व कड्यांचा मोठा झोपाळा झुलत असायचा. त्यावर सात आठ मुले बसून झुलत राहायची. या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत. अरे हो, एक मजा सांगू का, ओटीला भिंत फक्त एका बाजूला. समोर आणि दोन्ही बाजूंना फळ्या होत्या. त्या खाचेत वर खाली बसवलेल्या होत्या. सफेद रंगाने नंबर लिहिलेले असयचे व मध्ये धरायला एक आडवी पट्टी असायची. त्या फळ्या हळूहळू काढायच्या. आताच्या स्लायडींग विंडोसारख्या आणि मग ती ओटी जणू ओपन टेरेसच व्हायची. व अंगणाच्या पुढच, पार रस्त्यावरचहि दिसू लागायचं. दिवसा त्या फळ्या क्रमानें काढायच्या व झोपाळा कड्यावर लावायचा व रात्री उलट्या क्रमाने फळ्या लावून ठेवायच्या व झोपाळा काढून ठेवायचा असा उद्योग असे. पण त्यात वेळ गमतीत जाई. आमचा मिठाचा व्यापार होता. शेतावरून भातहि येई. त्यासाठी ही व्यवस्था असावी.
त्या ओटीच्या डाव्या बाजूला कोठारघर होते. त्याचीहि मजा. त्याला अशा बाहेरच्या बाजूला छोट्या छोट्या खिडक्या होत्या. एकेक खिडकी उघडायची की त्यातून बदाबदा धान्य बाहेर येई. आधी वरची मग त्याखालची अस तळापर्यंत जायच. भात संपला की त्यात आंब्याची अढी घातली जायची. त्यावेळी घरात माझी मोठी बहीण व माझा आतेभाऊ दोनच लहान मुले. त्यामुळे त्यांची खूपच चंगळ होई. नाश्त्याला आंबे जेवायला आंबे. तिन्ही त्रिकाळ आंबेच आंबे. आता २००-३०० रु. डझन आंबे खातांना एकेक मोजून खावा लागतो.
ओटीवरून दोनतीन पायर्‍या चढून गेलो की छोटीशी चौकोनी जागा होती. तिला लाकडी कठडा होता. तिथे कारकून बसत असे. एक लिहायचे तिरपे मेज व तिजोरी असे. ती तिजोरी मला खूप आवडायची. एवढी जाड व अनेक कप्प्यांची होती. सुटी नाणी, नोटा, त्यात एक चोरकप्पाहि होता. अगदी कुणालाहि न कळणारा. तिजोरीला पितळी कडी व दोन्ही बाजूला नक्षीदार हॅंडल्स होती. पण उचलायला खूप जड होती. व्यापारउदीम असल्यामुळें ती घरात असावी. आमचे पणजोबा झोपाळ्यावर बसून कारकुनाला सूचना देत हिशेब ठिशेब ठेवत असावेत. पोयनाडचे घर विकल्यावर ती वैभवशाली वस्तू मी खूप वर्षे सांभाळली. पण काही कारणाने राहत्या जागेचे खूप शिफ्टींग करावे लागल्याने ती शेवटी कुणाला दिली आठवत नाही.
तिथून आत गेले की माजघर म्हणजे हॉल लागे. त्यामध्ये भिंतीतील कपाटें म्हणजे फडताळे होती. ती मला खूप आवडत. त्यात मला काहीही लपवायला मिळायचे. खर म्हणजे या फडताळाला नवीन रूप दिल तर आजच्या छोट्या जागेला उपयोग होईल. कारण खालची जागा आडत नाही, लाकूड कमी लागते आणि मल्टीपर्पज होतात. ती फडताळे प्रत्येक खोलीत असायची. पुस्तकंसाठी, दिव्यांसाठी, दूधदुभत्यासाठी, लोणच्यासाठी आणि कशाकशासाठी. तसा एक हडपा म्हणजे मोठा लाकडी जड पेटारा अगदी ४ छोटी मुले सहज उभी राहतील असा मोठा होता. त्यावर पेट्रोमॅक्सची बत्ती, समया, लामणदिवे, लहानमोठे स्टॅंडचे दिवे, चिमण्या, असे दिव्यांचे संमेलनच तिथे असायचे. संध्याकाळ झाली की भाताच्या तुसाच्या वस्त्रगाळ पावडरने दिव्यांच्या काचा साफ करून त्यात त्या त्या प्रकारच्या वाती व तेल घालून दिवे सज्ज ठेवायचे व तिन्हीसांजानंतर दिवे उजळायचे व घर प्रकाशमय व्हायचे.
माजघरातून आत गेले (डाव्या बाजूने) की देवघर लागायचे. एका खूप मोठ्या कोनाड्याला देवळासारखी महिरप होती व आत दोन फळ्या होत्या. त्यावर देव मांडलेले असायचे. खूप मोठी समई व पोळपाएवढी सहाण व तीवर वरवण्ट्याएवढे चंदनाचे खोड होते. वर्षानुवर्षे चंदन उगाळून सहाणेवर मध्ये खोलगट भाग झाला होता. फॅमिली डॉक्टरसारखे तेव्हा फॅमिली गुरुजी होते ते रोज नित्यनियमाने यथासांग पूजा करीत. संकष्टी, एकादष्णी, अभिषेक असे देव्हार्‍यामध्यें विठ्ठल रखुमाई, शाळिग्राम अन्नपूर्णा व बाळकृष्ण होता. गणपती होता. सर्वात मला आवडायचा तो बाळकृष्ण. चांदीचा वजनाला जड, तळहातावर राहील एवढा. मोरपिसाची टोपी, कमरेला साखळ्या, हातात सलकडी, गोंडस गोजिरे रूप. हा मात्र मी अजून जपून ठेवलाय. गणपतीच्या म्हणे सोन्याच्या २१ दुर्वा होत्या. कोणी चोरल्या की निर्माल्यातून गेल्या माहीत नाही.
देवघरातून एक छोटासा जिना माळ्यावर जात होता. चांगला ऐसपैस. २ माणूस उंचीचा. तिथे एका खांबाला एक मोठे रांजण व त्यात एक मोटी रवी होती. ताक करायला. ते आठवल की मला गाण आठवायच
राधा गौळण करिते मंथन मनात हरीचे अविरत चिंतन
लोणी काढून घरातल्यांना पुरेसे ठेवून अख्ख्या गावाला ताक फुकट वाटले जाई. वर माळ्यावर सात छोट्या तपेल्यात तूप ठेवलेले असायचे.कशासाठी? तर निरांजनात घालण्यासाठी. माझ्या धाकट्या आत्याकडे सगळ्यासाठी निरांजनात तूप घालून वाती वगैरे घालून ती तयार ठेवण्याचे काम असायचे. त्या आत्याला तूप खूप आवडायचे. ती सर्व निरांजनात तूप घालून झाले की चमच्याने भरपूर तूप हातावर घेऊन खायची. एकदा हे आमच्या आजीने बघितले व खूप ओरडली. तर नाना (आजोबा) आजीला ओरडले व म्हणाले अग खाऊ दे ना. पोर नंतर दुसर्‍या घरी जाईल. तोपर्यंतच खाणार ना? तर आजी म्हणाली अहो दुसर्‍या घरी जाणार म्हणूनच तर म्हणते. दुसरीकडे अस दूधदुभत असेल नसेल. म्हणून आतापासूनच संयम हवा हो. माझी पण ती मुलगीच आहे.
देवघरातील फडताळे व हडपा होताच. त्यात मला वाटतेदेवाची व स्वयंपाकाची जास्तीची भांडी असावीत. एकूण पोयनाड हडप्पा संस्कृती होती म्हणायची. माजघराच्या दुसर्‍या बाजूला एक बाळंतिणीसाठी स्पेशल रूम होती. त्यात एक फडताळ व कॉट एवढेच असायचे. तिथून एक म्हणजे माजघरातून बाहेर पडायला दार होते. व गंमत म्हणजे त्याला कड्याकोयंडे होतेच पण दाराच्या दोन्ही बाजूला भिंतीत एक खोल होल भोके होती. एका भिंतीतून एक चौकोनी जाड मुसळ बाहेर येई ते समोरच्या भिंतीतील होलमध्ये घालायचे की बाहेरून हत्तीने ठोकले तरी दार काय उघडेल बिशाद असा कडेकोट बंदोबस्त. असे सर्व मुख्य दाराला बसवलेले असत त्याची लहानपणी खूप मजा वाटायची.
माजघरातून देवघरात गेले की एका बाजूला चार पायर्‍या उतरले की लांबट अशी मोठी खोली होती. तिचे दार अंगणात उघडे. मला वाटत दुपारी घरातील बायकांना विश्रांति घ्यायला, शिवण विणकाम करायला ती स्वतंत्र रूम असावी. देवघरातून उजवीकडे उतरले की स्वयंपाकघर लागे. तिथे फळ्यावर वेगवेगळी भांडी असत. पेले नक्षीचे मीनावर्कचे खूप तर्‍हांचे. तसे तांबेहि वेगवेगळे कलश, तांब्या, लोट्या, मारवाडी लोटे. थाळ्या, ताटे; मला आठवते की एक ताट कसले होते ते आठवत नाही. पण ते एकच होते व मला खूप आवडायचे व आतेबहीण रजूलाही तेच हवे असायचे. शेवटी भांडण नको म्हणून काकाने जाऊन तस्संच दुसर ताट आणल. देवघर मोठे लांबलचक होते. तिथेच पुरुषांच्या जेवणाच्या पंगती बसत. स्वयंपाकघरातून बायकांना वाढायला सोपे जाईल अशी ती सोय होती.
स्वयंपाकघरातून देवघरात न जाता डव्या बाजूने बाहेर पडले की पाठची पडवी होती. तिथे एक मोठ्ठे तपेले होते. त्यात दिवसभराचे पाणी साठवून ठेवत. आमच्या दारातल्या विहिरीला पाणी नव्हते त्यामुळे लांबून पाणी आणून त्यात सारखे ओतत राहायची ड्यूटी एका कुंभारणीवर होती. ते तपेले एवढे मोठे होते की अलीबाबाच्या चाळीस चोरापैकी २ चोर तरी त्यात सहज लपले असते अणि यमूताई मर्जिना झाल्या असत्या. त्या पडवीतच एक छोटासा दगडी खळगा होता. तो हळकुंड किंवा छोटसं काही कुटायच असल्यास तो वापरला जाई. कोपर्‍यात मुसळ, टोपली, जातं, सुपं असच गृहोपयोगी वस्तू निमूटपणे बसायच्या.
तिथून बाहेर पडलो की पाठच अंगण, त्यामध्ये गाईगुरांचा गोठा, थोडीफार झाड, विहीर, तुळशीवृंदावन आणि कुळाचे (कसणार्‍या शेतकर्‍याच) छोटस झोपडीवजा घर.
कधी कधी आपल्या स्मरणशक्तीची मजा वाटते. सिरीयलमध्ये कालच्या एपिसोडला काय झाल हे आठवत नाही. पण एका ऍडमधल्या पेल्यावरून पोयनाडची अख्खी सिरीयल अगदी बारकाव्यासकट आठवली बघा.

साठवणीतल्या आठवणी - १

केव्हातरी मधे एकदा नातवाचे स्टडी टेबल आवरत होते. एका डब्यात हे एवढे सुगंधी रबर, स्टीकर्स, तुटकी पेन्स, स्केचपेन्स, चमचमत्या टिकल्या, गिफ्ट मिळालेल्या पण कधी न वापरलेल्या असंख्य वस्तू. आपल्या दृष्टीने नुसता कचरा साठवलाय झालं. पण विचारल तर त्यातील एकहि वस्तू टाकून देणार नाही. मग मला आठवलं, आपणहि आपल्या लहानपणी असंच मोरपिसं, चित्रे, काचेचे तुकडे, मणी अन् असंच काहीबाही साठवत होतो. तरुणपणी कविता, ग्रिटींग कार्ड्स, वेगवेगळ्या गिफ्टस, त्यानंतर दागदागिने, लग्नानंतर वेगवेगळ्या आकाराची भांडी, संसाराला लागणार्‍या - न लागणार्‍या अशा अनेक गोष्टी साठवत गेले, प्रौढपणी साठवणीतल्या मिरच्या सांडगे पापड, लोणची अनेक साठवत गेलो. वयानुसार साठवणीतल्या एकेक गोष्टी कमी झाल्या. कधी टाकाव्या लागल्या, कधी बदलाव्या लागल्या, कधी हरवल्या त्यावेळी खूप वाईट वाटल.
पण आपल मन आहे ना ते छान आहे , खूप मोठ्ठं आहे त्यात किती साठवत गेलं तरी जुनं होत नाही. टाकून द्यावं लागत नाही. ते नेहमी ताजंतवानं राहातं. कधी ते आपल्याला प्रेरणा देतं कधी हळव्या मनावर फुंकर घालतं तर कधी नातवंडाशी गप्पा मारायला मदत करतं. अशा या मनातल्या साठवणीतल्या आठवणी.
आमचं घर वाडीतलं. एकमजली खेड्यामधले घर कौलारू या गावातील जणुं अवतरलं असं! वर आमची पाच बिर्‍हाडं. एकोपा असा की तसा नातेवाईकातहि नसेल. वाघमोडे नाना नानी होते. श्रीयुत वाघमोडे रेल्वेत फोरमन की काय होते. त्यांच्याकडे सगळी सुताराची हत्त्यारे होती. कोणतहि छोटंमोठं काम करायला तयार. एकदा आमची विळी हलत होती. त्यांनी तिला छान पितळी पट्टी लावली व खूरहि लावले. ती विळी अगदी परवापर्यंत माझ्याकडे होती. त्यांच्याकडे शिसवी मोठा डबल बेड (त्यावेळीहि होता बरंका) होता. त्या बेडवर मोठं ठसठशीत रुपायाएवढं कुंकू लावलेल, गळ्यात बोरमाळ, नाकीडोळी सरस अशी शिवशाहीत शोभेल अशा नानी बसलेल्या असायच्या. बिल्डिंगमध्ये लहान अशी मी पहिलीच त्यामुळे सर्वांचीच लाडकी. त्यांची तर जास्तच. त्यांना मी सही करायला शिकवून साक्षर केले. त्यांच्याकडे एकेक वस्तू अशा होत्या की त्या आज ऍण्टिक ठरल्या असत्या. नानानानी पान खायचे तो पानाचा सारा सरंजाम राहील असा चककीत जालीचा पितळी डबा. नानी आपला साजशृंगार करित ती त्यांची फोल्डिंग पेटी. त्यात कंगवा, कुंकू, मेण, पावडर, सर्व वस्तू तर राहातच पण फोल्ड करून उभा आरसा पण राही. जणुं हे त्यांचे छोटेखानी ड्रेसिंग टेबलच होते. या सर्वापेक्षां मजा म्हणजे ग्रामोफोन होता. एका बाजूने मोठी चावी, वर हिज मास्टर्स व्हॉईसचा कुत्रा त्या कर्ण्यावर डौलात बसलेला. गाणी कोणती ती आठवत नाही. पण एक गंमतीशीर रेकॉर्ड होती. तिचं नाव ‘भुताचे रेशनकार्ड’. किती वेळा ऐकली तरी त्यातली मजा काही कमी व्हायची नाही. त्यांच्याकडे कांदा, लसूण, मिरची, कोथिंबीर अशी वाटणं पंधरा पंधरा दिवस टिकणारी अशी असत. त्यावेळी फ्रीज कोणाकडे नव्हताच. तर वाटणाचा कसलाहि रस्सा त्यांच्याकडे घमघमत असे. मला त्या मायेने विचारत खातेस का जबू म्हणून. आणि (जयबाला हे अवघड नाव वाटे म्हणून मला पडलेल हे लाडकं नाव) मी ते त्यांच्याकडे छोट्या परातीत खालं की त्यांना धन्य धन्य वाटे.
त्यावेली कालनिर्णय कॅलेंडर अस्तित्त्वात आले नव्हते. त्यावेली पंचांगावरून सगळे कळायचे. तेव्हा त्या आईला म्हणायच्या, बामणीणबाई सांगा बरं संकष्टी कधी महाशिवरात्र कधी. मग दुपारच्या निवांत वेळी संकष्टी कधी, चंद्रोदय कधी, महशिवरात्र कधी, संक्रांत कधी, ती कशावर आहे, त्याचे फळ काय अशी सर्व माहिती त्या बिल्डिंगमधल्या सगळ्यांना सांगत असत. संक्रांतीवरून आठवलं, तेव्हा पूर्ण वाडीत एकमेकांकडे हळदीकुंकवाचे आमंत्रण असे. अगदी पोराबाळांसकट. तेव्हा आम्हीहि नवीन कपडे वगैरे घालून घरोघरी जाऊन लाडू व तिळगूळ गोळा करत असूं. त्यात कधी कमीपणा वाटला नाही. उलट गंमत वाटायची. वान कोणतेहि असेल पण त्याची चर्चा व्हायची नाही. कारण बोलावणारी आणि जाणारी यांच्यामध्ये असायचा केवळ स्नेह. बाकी कुठच्याहि गोष्टीला महत्त्व नसायचे.
या वाघमोडेंचे दुसरे भाऊ महाराष्ट्र वॉच कंपनीचे मालक आमच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये राहात. आमच्या वाडीत सार्वजनिक गणपतीच्या कार्यक्रमात आम्ही रोज रात्री त्यांच्याकडे मी व माझ्या बहिणी जात होतो. बाल्कनीत बसून कार्यक्रम पाहायचा आणि वाघमोडेंच्या मुलांची रनिंग कॉमेंट्री ऐकायची अस सारं दहा दिवस चालू असायचं. आप्पांनी (माझ्या वडिलांनी) माझ्यासाठी पेपरवाल्याला सांगून दरमहा चांदोबा टाकायला सांगितला होता. वाघमोडेंचा नातू शाम हा तेव्हा चांदोबा वाचायला घरी यायचा. बरीच वर्षं झाली या गोष्टीला पण कितीतरी वर्षांनी मी दुकानात गेले तेव्हा शामने विचारले काय ग तुझ्याकडे अजून चांदोबा येतो का आणि खूप गप्पा आठवणी झाल्या. दुकानातले सर्वजण आप्ला मालक कोणाशी असं काय बोलतोय हे बघतच राहिले आणि आम्ही हसतोय काय याचे आश्चर्य वाटून पाहातच राहिले.
मला लहानपणी एकवीस दिवसांचा टायफॉईड झाला. झोपून राहायचं मग करायचं काय? आप्पांनी विचारलं काय हवंय, मी खूप पुस्तके मागितली. अरेबियन नाईट्स, गलिव्हरच्या सफरी, शेरलॉक होम्स असं कितीतरी तेव्हांच वाचून झाले. या वाचनाच्या वेडातूनच पुढच्या आयुष्याला लायब्रेरियनची दिशा मिळाली. आमच्या शेजारी वाघमोडेंचा एक भाचा राहायचा. त्याच्याकडे त्याचे भरपूर मित्र यायचे. कधी तो नसला की आमच्याकडे चौकशी करायचे. त्यामुळे त्याचे मित्र बघता बघता आमचे फॅमिली मेंबर कधी झाले ते कळलंच नाही.
आमच्याकडे दीड दिवसाचा गणपती असायचा. गणपती दीड दिवसाचा पण दीड महिना उत्सवात जायचा. श्रावण महिन्यांत आप्पा आम्हाला घेऊन रणदिव्यांच्या कारखान्यांत जायचे व गणपतीची आगाऊ नोंदणी करायचे. हे बघा पिवळा पीतांबर, लाल शेला, शांत मुद्रा असा सोळा इंची गणपती आसनावर बसलेला हवा आम्हाला आणि हे पहा उंदीर ठेवायला विसरूं नका हं. गेल्या वर्षीं विसरला होतां बरं का. मग थोड्या दिवसांनी त्यांच्याकडून गणपती तयार झाल्याचा निरोप येई. तेव्हां कसं असे कीं वेगवेगळ्या मूर्ती नुसत्या बनवून ठेवायचे मग आपल्याला जसे पारंपारीक आपल्या खानदानाचे वैशिष्ट्य असेल तसे रंगरूपाने सजवून दिले जात. कांही दिवसांनी मूर्ती तयार झाली की निरोप यायचा. मग आप्पा मूर्तीच्या चारी बाजूनें मूर्तीचे निरीक्षण करून समाधान झाले की पाटकर या नावाचे लेबल त्या मूर्तीच्या गळ्यात घालून समाधानाने निश्वास टाकीत. मग नंतर त्या मूर्तीला मस्त फिनिशिंग होई. आता गंमत वाटते पेणच्या ट्रकमधून मूर्ती येतात, लोक बघतात, किंमतीची घासाघीस करून मूर्ती घेतात. गग गणपती जवळ आला की डेकोरेशनचे वेध लागत. शेजारच्या बिर्‍हाडातली मुले, आप्पांचे मित्र असे सारे मिळून डेकोरेशन करायला लागायचे. पण गणपती आणायची वेळ झाली तरी डेकोरेशन पूर्णच व्हायचे नाही. मग आप्पांचा आरडाओरडा, अरे आटपा रे, रात्रीचे अकरा वाजले , आता पुरे, गणपती आणायची वेळ झाली पण मग तुमची ठाकठोक कांही नको रे बाबा. असं करत ते कसंतरी संपवून मग आम्ही सारे जण गणपती आणायला जात होतो.
गणपतीच्या आदल्या दिवशी तर मजा असायची. आप्पा बाजारात जायचे, मोठ्ठ्या टोपलीत भारंभार भाज्या, नारळ, ती टोपली हमालाच्या डोक्यावर अशी खरेदी व्हायची. घरातील माणसे ४ - ५ असली तरी पंगतीला १५ - २० जण असायचे. आप्पांचे एक मित्र आम्ही त्यांना शंकरकाका म्हणत असू, चुरशीने पैज लावून मोदक खायचे. जेवणाला उशीर होणार म्हणून आम्हाला आमची कमाआत्या आधीच काहीतरी भरपूर खायला द्यायची. कारण आई व आत्या सोवळ्यात स्वैपाक करायच्या. भटजी येऊन नैवेद्य, आरती वगैरे झाल्याशिवाय जेवायला मिळायचे नाही ही सक्त ताकीद. मला मात्र विसर्जनाच्या वेळी रडू यायचं. आमच्या शेजारच्या काकींकडे पहिला रेडिओ आला तेव्हां आम्हाला इतका आनंद झाला जसा काही आमच्याच घरात रेडिओ आला. त्याचं गंमतीशीर कारण म्हणजे आमच्या व त्यांच्या प्रत्येक रूमला भिंतीत दार असायचं. दोन्ही बाजूने कड्या लावल्या की झालं. त्यामुळे आवाज स्पष्ट यायचा. श्रृतिका ऐकायचो, प्रपंच मधले टेकाडेभाऊजी (प्रभाकर जोशी), प्रभाकरपंत (वसंत पुसाळकर) आणि मीनावहिनी (नीलम प्रभू) यांचा आवाज ऐकत राहावासा वाटे. आणि रेडिओ सिलोनवरची बिनाका गीतमाला किती प्रसिद्ध होती. अमीन सयानीच्या आवाजाची माधुरी व पकड काही औरच होती. त्या मधल्या दाराचा उपयोग छान मोबाईलसारखा व्हायचा. काकी पाणी भरून झालं कां? आज काय केलं वगैरे वगैरे. पण असं कधी नाही वाटलं की त्यांची किंवा आमची त्या दाराने प्रायव्हसी जाते. आता तर बंद दारातील घरातल्या माणसांनाच घरातल्या माणसांपासून प्रायव्हसी हवी असते. या काकींकडे आंब्याची कोय भाजून त्यातील गर हासुद्धा खाण्यासारखा असतो ते कळलं. त्यांचा मुलगा कांदाभजी सुरेख करी व सर्वांना खायला खाली. एकदा तारीख ३१ मे होती. ते दोघे भाऊ घरात आणि इतर सर्वजण गावी गेले होते. आमच्याकडे बरीच छोटी मंडळी जमली होती. एकदोन मोठी देखील होती. दुपारी चहाबरोबर भजी कर म्हणून त्याला सांगितले. त्याने टाळाटाळ करायला म्हटले की या हवेत कसली कांदाभजी खाता? ती पहिल्या पावसातच खावीत. त्याच्या दुर्दैवाने संध्याकाळी पाचसाडेपाचला ढग जमून अचानक पाऊस आला. तरी तो करीना. मग छोट्यांचा जोडीला मोठे आले आणि त्याला ती करावीच लागली. मस्त धमाल आली. दुसरा मुलगा फोटोग्राफर. माझ्या लेकीचा वाढदिवस असला की ती त्याला हक्काने फोटो काढायला लावत असे. तो मला वाटतं तेव्हा पैसेहि घ्यायचा नाही. अस सगळा प्रेमाचा देवघेवीचा व्यवहार. माझ्या घरात टीव्ही पहिला आला तर बिल्डिंगमध्ये सगळेच बघायला येऊन घराचा सिनेमा हॉल होई. पण कोणालाच गैर काही वाटले नाही.
आप्पा म्हणजे माझे वडील वामन नारायण पाटकर. त्यांनी आमच्या दारावर नेमप्लेट करून लावली होती - व्ही एन्. पाटकर. त्याखाली इन आणि आऊट अशी अक्षरे होती. त्यावर सरकणारी पट्टी होती. आम्ही घरांत किंवा बाहेर असणार त्याप्रमाणें ती सरकवली जायची. ब्रिटिश अधिकार्‍यांबरोबर काम करून त्यांच्याप्रमाणेंच त्यांच्या वागण्यांत एक नीटनेटकेपणा व सफाई होती. त्यावेळचे मॅट्रिक शिक्षण घेतलेले म्हणजे खूपच वाटायचे. त्यामुळें ते सुंदर इंग्लिश बोलत. त्यांचे लिहिणेहि सुंदर होते. इंग्लिश असो वा मराठी, रामदासांनी म्हटल्याप्रमाणे अक्षर असावे सरळ, मोकळे, वाटोळे तसे आदर्श होते. त्यामुळें आमचे अक्षर, वाचन, बोलणें चांगले असावे याकडे त्यांचे लक्ष असे. ते आम्हांला इंग्लीशमधून प्रश्न विचारीत व त्याचे उत्तर मराठीतून दिले की त्यांना राग येई. ते रागवायचे व बोलायचे की म्हणून मी सांगतो टाईम्स ऑफ इंडिया वाचा. तुमचा शब्दसंग्रह वाढेल, वाक्ये येतील. तुम्ही ऐकत नाहीं. पण त्यामुळें मला शालेत इंग्लीशमध्ये चांगले मार्क मिळायचे. ते आजूबाजूच्या मुलांनाहि तर्खडकर इंग्लीश शिकवीत.
आमच्या वडिलांना माझी आत्या अप्पा म्हणायची. त्यामुळे आम्हीहि बाबा न म्हणता अप्पा म्हणायला लागलों. तर आमचे अप्पा दिसायला सावळे, फार उंच नाहीं, फार जाड नाही अशा मध्यम बांध्याचे पण एकदम स्मार्ट आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाचे होते. ते जानवे वापरीत, घरात धोतर नेसत व बाहेर जातांना शास्कीनची पॅंट आणि टेरिलीनचा फुलशर्ट घालून रुबाबात टॅक्सीने ऑफिसला जात. येतांना स्टार बेकरीतून ब्रेड व बटर - त्यावेळी अमूल बटर नव्हते पण साधारण त्याच चवीचे बटरपेपरमध्ये गुंडाळलेले बटर मिळे ते आणत. आणि खारी बिस्किटे आणीत. कधी कधी सुरती फरसाणवाल्याकडून सकाली गरमागरम जिलेबी आणि फाफडा असे खायला घेऊन येत. चांगल्याचुंगल्या खाण्याची त्यांना खूप आवड होती. त्यामुळें कधीहि घरात चिवडा लाडू असे. तर्‍हेतर्‍हेचे खाणे करून आई डब्यात ठेवायची. असे असले तरी त्यांची एक शिस्त होती. ती म्हणजे जेवतांना सर्वांनी एकत्र बसायचे. कोणीहि ताटात वाढलेले टाकायचे नाही. आवडले नसेल तर पुन्हा मागूं नका पण पहिले वाढलेले सर्वांनी खाल्लंच पाहिजे. ते म्हणायचे खाऊन माजा पण टाकून माजूं नका. त्यामुळें फायदा एक झाला. आम्हांला कार्ल्याची भाजी असो नाहीतर काही असो, सर्व भाज्या प्रकार आवडू लागले. आमची आई इंदौरची संस्थानिक त्यामुळे तिचे शाही पदार्थ व आप्पा कोकणातले त्यामुळे कोकणी - खूप खोबर्‍याचे, रसगोळीच्या आमट्या वगैरे अशा तर्‍हा असत. आप्पांचे मित्र होते शिवलकरकाका. चांगले बॉडी बिल्डर. आले कीं किचनकडे तोंड करून बोलायचे, पॅंट ढिली झाली आहे भाबी. कुछ खानेको दो. मग आमची आई या दीराचे लाडू चिवड्याने व चहाने पोट पूर्ण भरी आणि त्यांची पॅंट घट्ट होई अशी मज्जा.
आप्पांचे इंग्लीश चांगले. ब्रिटिश ऑफिसरबरोबर काम करणारे. त्यामुळे फर्डे इंग्लीश बोलत. अक्षरहि कर्सिव्ह व सुंदर. ते सर्वांना तर्खडकर इंग्लिश शिकवीत. आम्हांला बोलायचे मी इंग्लिशमधून विचारतोय तुम्ही मराठीत उत्तर का देता? टाईम्स ऑफ इंडिया वाचा असा त्यांचा आग्रह असे. त्यांची आणखी एक शिस्त म्हणजे कुठेहि म्हणजे अगदी आत्या मावशी यांच्याकडे आम्ही गेलो तरी सातच्या आत घरात आलं पाहिजे. हे सगळे शिस्तीचे असले, त्यांचा स्वभाव कडक असला तरी ते तेवढेच प्रेमळहि होते. ते खरे पूर्णतः शाकाहारी होते. पण जावयासाठी म्हणून मात्र एकदा हातात पिशवी लांब धरून स्वतः पापलेट घेऊन आले होते. असे कमालीचे प्रेमळ.
आमची आई सडपातळ, दिसायला छान, केस लांबसडक नाकी डोळी नीटस अशी छान होती. तसं आम्ही कधी कधी पिक्चरलाहि जात होतो. चिमणी पाखरं, बैजू बावरा अशा पिक्चरला आप्पा आम्हाला सर्वांना घेऊन जायचे. तिकिटे नाही मिळाली तर ब्लॅकने घेत. ब्लॅकने घेणे त्यांच्या नीतीनियमांत बसत नव्हते. पण सर्वांना हिरमुसले करून घरी नेणे त्यांना आवडत नसे.
नाट्यसंगीताची आवड आई आप्पा दोघांनाहि. आई तर अशी काम करता करता १ - २ ओळी रंगात येऊन गायची. तिला फुलांची, छान राहाण्याची आवड. आप्पांनी तिच्यासाठी फुलवाल्याला रोज वेणी, गजरा आणायची ऑर्डर दिलेली असायची. थंडीच्या दिवसात तेव्हा डिसिल्व्हा हायस्कूलच्या ग्राऊंडवर नाटके होत. तेव्हां नाटकांसाठी थिएटरच नव्हते. तर त्याचीहि सीझन तिकिटे आप्पा आणीत. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची माझी बहीण मेंबर होती. असं वाचन, नाटक, संगीत अशा समृद्ध वातावरणांत आमच्या जाणिवांच्या कक्षा वाढत गेल्या याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोंत. कारण कुठल्याहि इस्टेटीपेक्षां ही इस्टेट फार मोठी असते.
आला गेला, पैपाहुणा कधी नकोसा वाटलाच नाही. तेव्हा वसईला एस एस सी म्हणजे ११ वीसाठी सेंटर नव्हते. तेव्हा आमच्या वसईच्या आत्याने तिच्या दूधवाल्याचा मुलगा ११विला बसणार होता, त्याची तुझ्याकडे सोय कर, तो तुझ्या अंगावर पडणार नाही असं माझ्या आईला कळवलं. मला कळलंच नाही तुझ्या अंगावर पडणार नाही म्हणजे काय? तर त्याचा अर्थ म्हणजे तो काहीतरी दूध भाजी याची भेट देईल. भेट ती किती आणि आठ दिवस राहून अभ्यास करून परीक्षेलाच आमच्याकडून जाणं हे आजच्या शिस्तीत बसते का? पण आम्ही ते सहज स्वीकारलं.
आमच्या घरात वेगवेगळ्या वयाची मुले, माणसे येत. पण आम्हीं त्यांच्याशी मोकळेपणानें बोलत असूं, कॅरम पत्ते खेळत असूं. असे खेळीमेळीचे वातावरण होते, निकोप मैत्रीचे होते. अप्पा एवढे कडक असून मुलांमध्ये मूल होऊन खेळत असत. कॅरम, पत्ते खेळतांना कोणी चिटिंग केले की चिडत, आरडाओरड करीत. आई, यमूताई व ते कधीकधी सारीपाटाचा डाव मांडीत व खेळत असत. तो फासे कवड्यांनी खेळायचा सारीपाट खरं म्हणजे जपून ठेवायला हवा होता नातवाला दाखवायला. आयुष्य कसे रसिकतेने जगावं हे त्यांच्याकडूनच आमच्यामध्ये आलं असावं. आणि हे त्यांचं रसिकतेने जगणं शेजारच्या काकींच्या मुलाला खूप भावायचं.
माझी बहीण रत्नप्रभा नावाप्रमाणेंच गोरीपान, नाजूक अशी आणि तिचे गुणहि तिच्या नावाला शोभेल असेच होते आणि आश्चर्य म्हणजे आज पंचाहत्तर वर्षांची होऊनहि ती अजूनहि तशीच छान दिसते. परवा मी व ती आमःई शिवाजी पार्कला गेलो होतो. तेव्हा तिची एक मैत्रीण भेटली व म्हणाली तू अजून तशीच दिसतेस. याचं कारण म्हणजे मोजकं खाणं, तामसी न खाणं आणि या जोडीला शांत निगर्वी व चित्ती असो द्यावे समाधान या वृत्तीमुळे हे चिरतारुण्य तिला लाभले असावे. मेकप वगैरेच्या भानगडीत ती कधी पडलीच नाही.
माझ्या व तिच्यामध्ये तब्बल अकरा वर्षांचे अंतर. त्यामुळे अर्थात मी सर्वांची खूप लाडकी. त्यामुळे मी भलतेच हट्ट करायची. शाळेत जायला नको असायचे पण जिजा मला उचलून शाळेपर्यंत घेऊन जायची.माझा कंटाळा जाईपर्यंत तिने मला रोज उचलून नेलंय. तिला विणकामाची आवड आहे. एकदा मला तिनें घुंगुराची लेस विणून ती त्यावेळी टाफेटा सिल्कला लावून त्याचा छान परकर पोलका शिवला होता. तो मस्टर्ड कलरचा छान परकर पोलका मला अजूनहि आठवतो. आता कपातत कितीहि भारीभारी साड्या आहेत पण त्या मायेच्या घुंगुराची सर कशालाच येणार नाहीं. तिच्या हाताची चव तशीच. लोणी घालून केक किती सुंदर करते. तिचा आवाजहि छान. गाणि छान म्हणायची. एकदा तर तिने गाणे म्हणून अकरा बाहुल्या बक्षीस मिळवल्या. पण तो काळ सरेगम लिट्ल चॅंपसचा नव्हता म्हणून ती आवड तिथेच राहिली. तिचे चीज झाले नाहीं. ३०-३६ ठिपक्यांच्या मोठमोठ्या रांगोळ्याहि ती छान काढत असे. आमच्याकडे आमची एक आतेबहीण शिकायला म्हनून राहिली होती. ती जिजापेक्षा चार वर्षानें लहान. तिचे आणि आमचे एवढे छान जमायचे की कोणला काय पण आम्हाला स्वतःलाहि कधी वाटले की ती आमची सख्खी बहीण नाही असं. तिचे आईअप्पांवर पण फार प्रेम होते. तिला वरणभातावर तुपाचा मोठ्ठा गोळा फार आवडायचा. तळलेले पापड आवडायचे. पाव मात्र आवडायचा नाहीं. शी! ते कसले म्लेंच्छांचे खाणे. म्लेंच्छ हा शब्द तेव्हा इतिहासाच्या पुस्तकात इंग्रजांसाठी वापरीत. तिला असे मोठमोठे शब्द वापरायची सवय होती. कधी त्यातून विनोद तर कधी भलताच अर्थ निघे व गंमत होई. एकदा आमचे शेतावरचे पोयनाडचे तांदूळ आणले नव्हते. तेव्हां मुंबईत रेशनवर तांदूळ मिळत. तर त्यात थोडे जास्त खडे असत. ते दोन दिवस नेमके तिलाच भातात खडे सापडले. तेव्हा ती म्हणाली काय मला खड्यांचा रतीबच लावला की काय. तेव्हा अप्पा तिला ओरडले. रजू रतीब चा अर्थ कळतो का तुला? दुधाचा रतीब शब्द माहीत आहे म्हणून रतीब वाटेल तिथे वापरायचा. आणि मग एवढा हशा पिकला की विचारता सोय नाही.
आमच्याकडे कॅरम पत्ते खेळायला सर्व जण येत असत. आप्पाहि त्यात खेळायचे. पोरांनी चीटिंग केले की चिडायचे. आमच्याकडे सारीपाट कवड्यांनी खेळायचा तोहि असायचा. खरं म्हणजे तो सारीपाट नातवांना दाखवायला ठेवायला पाहिजे होता. इंग्लीशमध्ये ते सर्व भाषांतरित करणं कठीणच आहे. ठिकरी, सागरगोटे, लगोरी, विटीदांडू, काचापाणी हे सारे खेळ त्यावेळचे कसे बिनखर्चाचे किंवा अल्पखर्चाचे असूनहि त्यात खूप कसब व गंमतहि असायची. ती आताच्या चारपाच हजारांच्या गेमबॉयसारख्या महागड्या खेळांमध्ये वाटत नाहीं.
दिवाळीचे दिवस तर कधीच विसरू शकणार नाही एवढे सुंदर व अविस्मरणीय होते. आप्पा कंदिलासाठी काड्या तासून एका आकाराच्या व गुळगुळीत करायचे. नंतर तो कंदील बांधणे, त्याला पेपर लावून त्यांच्या शेपट्या लावायचे काम आम्ही करायचो. कंदिलाच्या जॉईंटवर क्रेप पेपर्सची गुलाबाची फुले व पाने ही वडिलांची खासियत. पानाच्या आकाराच्या पाकळ्या कापून त्या रुमालात धरून तो रुमाल ठराविक पद्धतीने फिरवला की पानांच्या रेषा तयार व्हायच्या. गुलाबाच्या पाकळीत कातर उलटी फिरवली की पाकळ्या वळायच्या. आणि वरच्या पट्टीला कतरलेल्या करंज्या लावल्या की एक देखणा पारंपारिक आकाशकंदील तयार होई. दिवाळीला आठवडा राहिला की बाल्कनीत प्रत्येक घरापुढे तांबड्या मातीने सारवून रांगोळीसाठी अंगण सजून व्हायचं. माझी मोठी बहीण, आतेबहीण ३२ -३६ ठिपक्यांची रांगोळी दुपारपासून संध्याकाळपर्यंत तल्लीन होऊन काढत. स्वयंपाकघरांत बेसन, रवा ढवळल्याचे आवाज आणि दरवळणारा सुगंध आमच्या लहान मुलांपर्यंत येत असे. पण देवाला दाखवल्याशिवाय मिळत नसे. त्यामुळे धीर धरा रे, धीरापोटी मिळेल फराळ रे असं म्हणून गप्प राहावे लागे. पहाटे नर्कचतुर्दशीला लौकर उठून फटाके कोण वाजवतंय याची चढाओढ असे. मग एकमेकांकडे रुमालाने झांकलेली फराळाची ताटेजात व शुभेच्छांची देवाणघेवाण होई.
नातवाचे टेबल आवरता आवरता कितीतरी दिवस हरवलेली चावी मिळाली माझ्या या आठवणींच्या खजिन्याची. आनि मी मग नातवाचा कचरा नव्हे तो खजिना तसाच जपून ठेवला.